विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय येथे बुधवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व मिसाईल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथप्रेम वाढावे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, ज्येष्ठ शिक्षक श्री. सुभाष पाटील, दीपक पाटील तसेच ग्रंथपाल श्री. सुनील अंबिकार व सौ. जागृती मोराणकर उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध लेखकांची आवडती पुस्तके वाचून त्यावरील मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. ग्रंथपाल श्री. सुनील अंबिकार यांनी शाळेतील वाचनालयात उपलब्ध नव्या पुस्तकांची माहिती दिली. आपल्या मनोगतात मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे म्हणाले, “वाचन हे केवळ ज्ञानाचे साधन नसून विचार आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. वाचनामुळे विद्यार्थी आत्मविश्वासू आणि विवेकी बनतात.”
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. दिवसाभर चाललेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढविण्याचा प्रयत्न फलदायी ठरला.