जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळ विभागात “पर्यावरणपूरक दीपावली” साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागवणे हे होते. या निमित्ताने शाळेतील चित्रकला शिक्षिका सौ. नीलिमा सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 60 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी विविध संकल्पनांवर आधारित, रंगीबेरंगी व आकर्षक आकाशकंदील तयार केले. सर्व कंदील पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून बनविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे कंदील शाळेच्या परिसरात सजवून दीपावलीचा आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे हे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, ज्येष्ठ शिक्षक श्री. सोमनाथ महाजन व सौ. नीलिमा सपकाळे उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीतील विविध दिवसांचे महत्त्व सांगत फटाक्यांचे ध्वनी, वायू, जल व माती प्रदूषणास कारणीभूत ठरणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, “फटाके फोडल्यामुळे केवळ निसर्गच नव्हे, तर माणूस, पशू-पक्षी आणि जलस्रोत यांच्याही आरोग्यावर विपरित परिणाम होतो.”
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना “फटाके मुक्तीची शपथ” देऊन शांत, स्वच्छ, प्रकाशमय व पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. सोमनाथ महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “फटाक्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थी जर चांगली पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य विकत घेतले, तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल.”उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप यांनी शालेय सूचना देत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. नीलिमा सपकाळे, श्री. हिम्मत काळे, श्री. गौरव देशमुख, श्री. आनंद पाटील, श्री. किशोर माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण होऊन “फटाके मुक्त, पर्यावरणपूरक दीपावली” साजरी करण्याचा सुंदर संदेश समाजाला देण्यात आला.