नशिराबाद | प्रतिनिधी │ पोलीस दक्षता लाईव्ह :- बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी, कष्टाळू आणि जबाबदार आहे. बचतीचे व स्वावलंबनाचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या उमगले असून, आज त्या केवळ गृहिणी नसून उद्योजकतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. “उद्योग उभारणीच्या वाटचालीत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. नशिराबाद येथे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उभारण्यात आलेल्या ‘महिला बचत गट मॉल’ चे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडले. या मॉलमध्ये नशिराबाद व परिसरातील महिला बचत गटांच्या लघुउद्योजिकांनी साडी, लेडीज गारमेंट्स, बांगड्या, ब्युटी पार्लर साहित्य, जनरल स्टोअर, फरसाण, स्वीट्स, चाट सेंटर, भाजीपाला विक्री आदी १३ विविध व्यवसायांची दुकाने सुरू केली आहेत. काही दुकाने स्वतःच्या मालकीची असून, काही महिलांनी ती भाड्याने घेतली आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा मॉल महिलांच्या स्वप्नांचा उत्सव ठरला आहे. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, “बचत गट चळवळ ही ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीचे प्रभावी साधन ठरली आहे. या महिलांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि व्यावसायिकता प्रशंसनीय आहे. शासनाच्या विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना नवी गती देण्यात येईल.”
दरम्यान, नशिराबाद येथे महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या ‘बहिणाबाई मार्ट’साठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी स्थायी व्यवसाय केंद्र उपलब्ध होणार असून, “महिलांना स्थानिक बाजारपेठेत आपल्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी मिळणे म्हणजे ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन हेमांगी टोकेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वाती सोनवणे यांनी मानले.या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, गटविकास अधिकारी सरला पाटील, जिल्हा व्यवस्थापक एच. एम. भोई, हायस्कूल चेअरमन पिंटू शेठ पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, संचालक चंदू भोळे, युवा सेनेचे चेतन बऱ्हाटे व दीपक खाचणे, तसेच महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा प्रमिला सपकाळे, ग्रामसंघ अध्यक्षा सोनल टापरे, सुनिता शिवरामे यांसह नशिराबाद व परिसरातील मोठ्या संख्येने महिला बचत गट सदस्य उपस्थित होत्या. या मॉलच्या स्थापनेमुळे नशिराबाद परिसरातील महिलांना उद्योग व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होऊन ‘स्वावलंबी महिलांचे सशक्त नशिराबाद’ हा नवा आदर्श निर्माण होणार आहे.