Monday, October 20, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणूक: महायुती विरुद्ध स्थानिक आघाड्यांची चुरस ; नव्या समीकरणांनी राजकीय...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक: महायुती विरुद्ध स्थानिक आघाड्यांची चुरस ; नव्या समीकरणांनी राजकीय तापमान तापले

नशिराबाद | मुख्य संपादक चंदन पाटील | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरात नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. आगामी निवडणूक ही पारंपरिक युती, स्थानिक नेतृत्वातील अंतर्गत समीकरणे आणि नव्या राजकीय आघाड्यांच्या चाचपणीमुळे चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप-शिवसेना युती पुन्हा मजबूत होण्याचे संकेत.
परंपरागतरीत्या नशिराबाद नगरपरिषद क्षेत्रात भाजप-शिवसेना युतीचा प्रभाव राहिला आहे. मागील काही निवडणुकांतील अनुभव लक्षात घेता ही युती पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक संघटनांमधील समन्वय प्रयत्नांना गती मिळत असून एकत्रितपणे उमेदवारीची आखणी होण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी इच्छुकांच्या भेटी गाठी आणि मोर्चे बांधणी करीत दोघं राजकीय पक्ष कामाला लागल्याचे दिसत आहे.

महायुती विरुद्ध स्थानिक आघाडी उदयास येण्याची शक्यता.
राजकीय समीकरणांमध्ये आता महायुतीच्या विरोधात स्थानिक आघाड्या आकार घेत आहेत. गावातील दोन प्रभावशाली स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र गटाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले असून त्यामुळे निवडणुकीचा त्रिशंकू सामना संभवतो. या स्वायत्त आघाड्यांमध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक तसेच नव्याने उदयास येणारे तरुण नेतृत्व एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे समीकरण महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यासाठी शतकातील प्रभावशाली स्थानिक नेत्यांनी तयारी केल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस आणि इतर घटकांची भूमिका.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व काँग्रेस या पक्षांनी अद्याप स्पष्ट रणनीती जाहीर केलेली नसली तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढतीची तयारी सुरू असल्याचे दिसते. जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेत, स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय खुले ठेवला आहे. त्यामुळे या पक्षांच्या हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.

शहरात मुस्लिम मतदारांचा वाढता प्रभाव ; AIMIM ची शहरात जोरदार मोर्चे बांधणी.
नशिराबाद शहरात मुस्लिम मतदारांची सख्या लक्षात घेता या वेळी AIMIM ने शहरात नव्याने मोर्चे बांधणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार AIMIM नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 10 प्रभागांवर 20 जागांसाठी उमेदवार देणार असून त्यांनीही शहरात आपली मोर्चे बांधणी केलेली आहे. त्यामुळे या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आगामी निवडणुकीत वैचारिक चढाओढ.
नशिराबाद नगरपरिषद निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून स्थानिक विकास, शहरी नियोजन, पाणीपुरवठा, स्वच्छता व रोजगारसंधी अशा महत्त्वाच्या विषयांवर मतदारांचा कल ठरणार आहे. विविध पक्षांनी आता प्रचार आराखड्याच्या तयारीस प्रारंभ केला असून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याची शक्यता आहे.

राजकीय समीकरणांचा निर्णायक टप्पा.
सध्याच्या घडीला नशिराबादमध्ये महायुती पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. मात्र स्थानिक स्तरावरील असंतोष, स्वतंत्र गटांची निर्मिती आणि उमेदवार निवडीतील समीकरणे यामुळे अंतिम निकालावर परिणाम होऊ शकतो.राजकीय पटलावरील प्रत्येक पाऊल आगामी काही आठवड्यांत नशिराबादच्या नगरपरिषद निवडणुकीचा चेहरा ठरवणार आहे. शहरात मुस्लिम मतदारांचा वाढता प्रभाव तसेच AIMIM ने शहरात नव्याने केलेली मोर्चे बांधणी यावरून कळेल पारंपरिक युतींचा गड टिकतो की नव्या आघाड्या जनतेचा विश्वास संपादन करतात.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या