भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– भुसावळ शहरात जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी बंदुकीतून फायर करण्यात आल्याची गंभीर घटना ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास जुनासातारा परिसरात घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी काही तासांत कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांसह दोन अल्पवयीन बालकांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे.फिर्यादी संदीप मनोहर कोळेकर (रा. जुनासातारा, भुसावळ) हे घरी असताना हॉटेल जलसा येथे त्यांच्या मुलासोबत झालेल्या वादातून आरोपी चंद्रकांत उर्फ बाबा विनोद घेगट (वय २४, रा. वाल्मीकनगर) व कुंदन अनिल पठाडे (वय १९, रा. दिनदयालनगर) तसेच वाल्मीकनगर येथील दोन अल्पवयीन बालके हे फिर्यादीच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागले. फिर्यादी बाहेर आल्यावर आरोपींनी त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. यावेळी जाब विचारताच चंद्रकांत उर्फ बाबा याने कमरेतून गावठी कट्टा काढून फिर्यादीवर रोखला. फिर्यादीने घाबरून त्याचा हात झटकताच आरोपीने फिर्यादीवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायर केला मात्र हा फायर मिस झाला.फायरचा आवाज ऐकून आलेल्या नागरिकांनी आरोपींना आवरण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व अल्पवयीन बालकांनी साक्षीदार सुरेश भोई यांना चापटा व बुक्क्यांनी मारहाण करून घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३०६/२०२५ भा. न्या. सं. कलम १०९, ३५२, १८९(२), १९१(२)(३) सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी काही तासांतच शहरात लपून बसलेल्या ठिकाणावरून दोन्ही आरोपी व दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत राउंड जप्त करण्यात आले आहेत.अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन बालकांना बाल न्यायालयात हजर करून जळगाव येथील रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल भंडारे, पोहेका संदीप पालवे, पोकों राहुल भोई, दिपक शेवरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे तसेच स्था. गु. शाखा जळगाव येथील पोकों प्रशांत परदेशी यांनी पार पाडली. दरम्यान, आरोपी कुंदन अनिल पठाडे व चंद्रकांत उर्फ बाबा विनोद घेगट यांच्यावर यापूर्वीही मुक्ताईनगर व बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

