नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळता यावा, यासाठी नगरपरिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करून आता दिवसातून केवळ एक तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती कीर्तिकांत पंडित चौबे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.शहरातील अनेक भागांत रिकामे वाहणारे नळ, गळके नळ तसेच तुटलेल्या पाइपलाइनमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेऊन सभापती चौबे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरात प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. यावेळी रिकाम्या वाहणाऱ्या नळांना स्वतःच्या हाताने बुच लावून पाण्याची नासाडी थांबविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारीही सक्रिय सहभाग घेत असून, गळती दुरुस्ती, बुच लावणे तसेच नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.केवळ आदेश देऊन न थांबता स्वतः रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सभापती कीर्तिकांत चौबे यांच्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पाणी बचतीसाठी लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कृतीतून आदर्श निर्माण केल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
यावेळी सभापती चौबे यांनी सर्व नगरसेवक बंधू-भगिनींना आवाहन केले की, प्रत्येकाने आपल्या प्रभागात लक्ष देऊन अशाच प्रकारे रिकामे वाहणारे नळ आणि पाण्याची गळती शोधून ती थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे. प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, सामूहिक प्रयत्नांतून पाण्याची नासाडी निश्चितच रोखता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाणी वाचवा – भविष्य वाचवा!

