मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील बेळी येथे आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची ,झोपड्यांची पत्रे उडून गेली आहेत.यामुळे ग्रामस्थ हतबल झाले असून त्यांना रडू कोडळले आहे. त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बेळी गावाला आज दुपारी वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. यात विशेष करून जोरदार वादळामुळे गावासह शिवाराचे मोठे नुकसान झाले. गावातील बहुतांश घरांची पत्रे दूरवर उडून गेली आहेत, यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून यामुळे गावात शिरण्यासही अडचण येत आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला.
या वादळाचा शिवारालाही मोठा फटका बसला आहे. शेतांमधील पीक हे अक्षरश: आडवे झाले असून शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. या भयंकर वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकार्यांनी तेथे धाव घेतली. रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या वादळामुळे बेळी येथील ६० पेक्षा जास्त घरांची पत्रे उडून गेली आहेत. या लोकांचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. तसेच यामुळे बहुतांश शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने आमचा आता वाली कोण ? असे नुकसानग्रस्त नागरिक बोलून दाखवत आहे.