Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याट्रॅफिक पोलिसांसाठी संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे यांचे दिलासादायक पाऊल...!

ट्रॅफिक पोलिसांसाठी संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे यांचे दिलासादायक पाऊल…!

मुंबई/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई सध्या सर्वत्र रखरखते ऊन असून असह्य होत आहे,याची झळ सगळ्यांनाच बसत आहे.यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी रस्त्यावर तैनात असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबद्दल महत्त्वाचे आणि सकारात्मक आदेश काढले आहेत. दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ आहेत. भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले आहे. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र कडाक्याचे ऊन असून सुद्धा वाहतूक पोलीस जीवाची,आरोग्याची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असतात. वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे , त्यांना संरक्षण मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांनी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.या निर्णयाचे ट्रॅफिक पोलिसांसह जनतेने सुद्धा याबाबत समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत याचे हे उदाहरण आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या