जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ मेहरूण संचलित,जय दुर्गा प्राथमिक, माध्यमिक,आणि कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालयात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पालखीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विठ्ठल रुखमाईच्या पालखीचे पूजन महापौर जयश्री महाजन तसेच ललित धांडे, जय दुर्गा माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका ज्योती इंगळे व जय दुर्गा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत ठेका धरला. विद्यार्थिनींनी शिरावर तुळशी वृंदावन घेऊन पांडुरंगाच्या भक्तीत मग्न होऊन आनंद व्यक्त केला. अशा पारंपारिक पद्धतीने वारी परिसरातील निळकंठ नगर, सप्तशृंगी कॉलनी, आदित्य चौकातून दिंडी निघाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी तसेच पालकवृंद यांचा सहभाग होता.