शहादा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहादा येथील वनक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात कार्यालयातील वनपाल व वनरक्षक यांच्यासह एका खाजगी व्यक्तीला तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच मागितली म्हणून येथे गुन्हा दखल झाला आहे. नासिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार याचा लहान भावा विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दखल झाला होता अटकही करण्यात आली आहे. त्या गुन्ह्यात त्यास जामीन मिळण्यास मदत व्हावी याकरिता शहादा वनविभाग परिक्षेत्र कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यालयात नेमणुकीस असलेले दरा येथील वनपाल संजय मोहन पाटील, तसेच वनरक्षक शहादा दीपक दिलीप पाटील यांनी सदर तक्रारदारकडून दि. 8 मे 2023 रोजी 2 लक्ष रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे खाजगी व्यक्ती नदीम खान पठाण याने सांगितले. तडजोडी अंती 9 मे 2023 रोजी एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पडताळणी करून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधिक्षिका श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक प्रवीण महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी आरोपी नदीम खान पठाण याने संजय मोहन पाटील व दीपक दिलीप पाटील यांच्याकरिता एक लाख रुपये लाच आणि वकिलाकरिता 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.