अमळनेर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात खुनांच्या मालिका सुरूच आहेत.तब्बल तीन महिन्यांनी हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार अमळनेर येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.या खुनाची चर्चा परिसरात होत आहे. सीसीटीव्हीतून हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयतांचे नाव आहे. नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५, रा माळीवाडा,अमळनेर असे आरोपीचे नाव आहे.
या घटनेबाबत अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरेंद्र चौधरी याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ साई आणि रुपाली हॉटेल असून दगडू पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहत होता. अमळनेर येथे हॉटेलमध्ये तो काम करीत होता आणि पोटाची खळगी भरत होता. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिली की, सकाळी सहा वाजता हॉटेलकडे फेरफटका मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती तसेच छातीला खरचटलेले होते. तेथून नरेंद्र याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले होते. ६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. चौधरी याने अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र सुरत येथील अहवाल, दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी कसून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनस्थळाजवळील फुटेज ( शूटिंग ) तपासली असता २२ एप्रिल रोजी पहाटे मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता. असे दिसत आहे. दगडू हा खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडू च्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला ,आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस घनश्याम अशोक पवार याच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी वय ३५ रा माळीवाडा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.ढिकले हे करीत आहेत.

