अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पाचोरा, भुसावळ ,जळगाव शहर आणि एरंडोल भागात गेल्या आठवड्यात अनेक चोऱ्या झाल्या आहेत.घरफोडी व इतर गुन्ह्यांची मालिका सुरूच असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे १० रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान एकाच वेळी वेगवेगळ्या ७ ठिकाणी चोरांनी दुकाने व घरफोडी केल्याची घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मांडळ येथील महेश जैन यांच्या किराणा दुकानातून चोरट्यांनी अंदाजे २५ ते ३० हजारांचा तर नीलेश पाटील यांच्या कृषी केंद्राचे कुलूप तोडून लॅपटॉप, रोख ३० हजार व वाल्मीक पाटील यांच्या रेशन दुकानदारांच्या गोदामातून ज्वारी गोणी, दोन ते तीन हजार रोख, तसेच अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स या दुकानातून ४०० ग्रॅम चांदी तर १६ ग्रॅम सोने व २ हजार रोख,कमलाकर आहिरराव यांच्या ज्वेलर्समधून ६ ते ७ हजार रोख रक्कम चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस खात्याबद्दल नाराजीचा सूर ग्रामस्थांमध्ये निघत आहे.घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान बावड़े येथून त्याच रात्री बोलेरो गाडी चोरीस गेल्याची चर्चा आहे. याच गाडीतून मांडळ गावात प्रवेश करून चोरट्यांनी दुकाने व घरफोडी केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.