Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमबापरे...! चोवीस तासांत तीन हत्याकांडाने उपराजधानी हादरली, पोलीस खाते निष्क्रिय असल्याचा सूर

बापरे…! चोवीस तासांत तीन हत्याकांडाने उपराजधानी हादरली, पोलीस खाते निष्क्रिय असल्याचा सूर

नागपूर / प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खून ,दरोडे या घटना वाढल्या आहेत. उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गेल्या चोवीस तासांत तीन हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. तर हुडकेश्वरमध्ये पती-पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.मेहबूब खान (गिट्टीखदान), बादल पडोले (यशोधरानगर) आणि महेश उईके (जरीपटका) अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सुखदेव उईके आणि रेखा उईके अशी हुडकेश्वरमधील जखमी पती-पत्नीचे नाव आहे.पहिल्या घटनेत कपिलनगर येथून १२ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ट्रक चालक मेहबूब खान याची लुटून हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. काटोल नाक्याजवळ ट्रक चालकाचा मृतदेह आढळल्याने त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याच सहकाऱ्यांनी त्याची हत्या केली. मेहबूब प्यारे खान (४७, कामगारनगर) हा ट्रकचालक ८ ऑगस्ट रोजी कळमना बाजारातील ट्रकमध्ये हरभरा व इतर माल घेऊन अमरावती जिल्ह्यातील वरुडच्या दिशेने गेला होता. त्याच्यासोबत मुख्तार बेग व लाला ऊर्फ छोटेलाल निशान हे दोघे होते. मेहबूब तेथून कळमना बाजारात नवीन माल घेऊन येणार होते. मेहबूब बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी १० ऑगस्टला कपिलनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. वरुड पोलीस ठाण्यात देखील चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान वरुड पोलिसांनी मुख्तार आणि लाला यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी मेहबूबची हत्या केल्याची बाब कबूल केली. खून केल्यानंतर आरोपींनी मेहबूबचा मृतदेह काटोल नाक्याजवळील झुडूपात फेकल्याची माहिती दिली. पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. दुसऱ्या घटनेत चारित्र्याबाबत अपशब्द काढल्याने झालेल्या वादातून एका महिलेने तिच्या सहकाऱ्याच्या मदतीने एका मजुराची हत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महेश उईके (४०) असे मृताचे नाव आहे. तर राजकुमारी (३५) व करण उईके (४५) अशी आरोपींची नावे आहेत. करण व महेश हे नारा परिसरात राहायचे. शनिवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास तिघेही दारू पित बसले होते. दरम्यान, महेशने राजकुमारीच्या चारित्र्याबाबत अपशब्द काढले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. महेशने तिला मारहाण केली. त्यानंतर करण आणि राजकुमारी यांनी महेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. पहाटे तीन वाजता नारा परिसरात गस्त घालणाऱ्या पथकाला दोन महिला दिसल्या. त्यांच्याजवळ चौकशी केली असता महेश जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ महेशला मेयो रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजकुमारीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी करणचा शोध सुरू केला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर राजकुमारीलाही ताब्यात घेण्यात आले. तिसऱ्या घटनेत, शहरातील यशोधरानगरात बादल पडोळे नावाच्या कुख्यात गुंडाचा त्याच्या साथीदारांनीच चाकूने भोसकून खून केला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजता कांजी हाऊस चौकात घडली. आरोपी चेतन सूर्यवंशी आणि हर्ष बावणे हे दोघेही बादल पडोळे यांचे मित्र होते. यांनी एका युवकाचा काही वर्षांपूर्वी खून केला होता. त्यानंतर त्यांच्यात टोळीयुद्ध पेटले होते. त्यातूनच चेतन आणि हर्ष यांनी बादलचा काटा काढण्याचे ठरवले. रविवारी दुपारी कांजी हाऊस चौकात बादलचा चाकूने भोसकून खून केला.पोलीस खात्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.

पती-पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला
हुकडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुखदेव उईके हे पत्नी रेखा उईके यांच्यासोबत शनिवारी रात्री खरसोली गावातील एका नातवाईकाच्या लग्नात गेले होते. लग्नात वाद झाल्याने आरोपी दिलीप पाटील याने सुखदेव यांना मारहाण केली. पतीला मारहाण होत असल्याचे बघून पत्नी रेखा वाद सोडवायला आल्या. आरोपीने पती-पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. गंभीर जखमी दाम्पत्यावर उपचार सुरू असून सुखदेव यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. पोलिसांची दोषपूर्ण गस्तप्रणाली आणि गुन्हेगारांवरील वचक नाहीसा झाल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या