जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील नशिराबाद नगरपंचायत स्वच्छता कामगाराचा मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास विशाल गोपी चिरावंडे नशिराबाद (वय २७) याचा गटार साफ करताना शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार नशिराबाद येथील सोपान वाणी यांचे नशिराबाद येथील भवानी नगर येथे गावालगत शेत असून, शेताच्या बांधला लागून गटार आहे ती तुंबल्याची तक्रार करण्यात आली होती. ती साफ करण्यासाठी सकाळी ९.१५ वाजता विशाल चिरावंडे व अनिल बेडवाल व काही महिला कामगार यांच्यासह परिसराची सफाई करण्यासाठी गेले होते. तुंबलेल्या गटारीतील घाण विशाल फावड्याने बाहेर काढत होता.फावड्याने गटार काढत असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. या वेळी जवळच असलेल्या अनिल बेडवाल व महिला कामगार यांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. महिलांनी त्याला लाकडी दांड्याने दूर करण्याचाही प्रयत्न केला. विशालला वाचविण्याच्या प्रयत्नात अनिललाही विजेचा धक्का लागला. घटनास्थळावरून बेशुद्ध विशालला जीएमसी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.विशालच्या पश्चात पत्नी तसेच दोन लहान मुली आहेत.
संतप्त नातेवाइकांचा जीएमसीत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर हल्ला
सदरील घटनेची मिळताच, विशालचे नातेवाईक तसेच पालिका कर्मचारी जीएमसी रुग्णालयात मोठया संख्येने तेथे जमा झाले होते. गटारीत करंट उतरविले असल्याच्या संशयावरून नातेवाईक व पालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनी दोषीवर कारवाईची करण्याची मागणी केली. संतप्त तरुणांच्या एका घोळक्याने जीएमसीत उभ्या असलेल्या (१०८) रुग्णवाहिकेवर हल्ला करून तिची तोडफोड केल्याने तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या वेळी शेतमालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी जीएमसीत जमाव नियंत्रणात येत नव्हता. तेथे केवळ दोनच पोलिस कर्मचारी उपस्थित असल्याने परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली होती.त्यांच्याकडून जमाव नियंत्रणात येत नसल्याने तणावदेखील वाढत होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहता जीएमसी प्रशासनाने पोलिसांना फोन करून अतिरिक्त कुमक बोलवली.