मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतली आहे.तर दुसरीकडे काकांचे बोट सोडून अजित पवारांनी देखील राष्ट्रवादी ताब्यात घेतल्याचे चित्र घडले आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहचला आहे. अजित पवार यांच्या गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आप-आपली भूमिका मांडणार आहेत.
राष्ट्रवादीमध्ये फूट नसल्याचे शरद पवार म्हणत असले तरी हे प्रकरण आता थेट निवडणूक आयोगाकडे गेले आहे. दोन्ही गटाकडून आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य केले आहे. दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारले. या वेळी अजित पवार यांनी त्यांचीच बाजू खरी असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावले ते जाणार आहोत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.