Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावकृषी विज्ञान केंद्र जळगाव येथे कापूस पीक कार्यशाळेत महत्वपूर्ण मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथे कापूस पीक कार्यशाळेत महत्वपूर्ण मार्गदर्शन

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांचा संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत अति सघन कापूस पीक लागवड व दादा लाड तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा पार पडली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ .दीपक दहात हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव सी.एस. पाटील आणि प्रकल्प उपसंचालक (आत्मा) पांडुरंग साळवे उपस्थित होते. कार्यशाळेसाठी कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी अधिकारी ,पर्यवेक्षक तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा लाड तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये करावा.

सदरील कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. शरद जाधव विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विशेष कापूस पीक प्रकल्पाचा उद्देश अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान व दादा लाड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर होईल तसेच कृषी विज्ञान केंद्र मार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सी. एस. पाटील यांनी जिल्ह्यातील कापसाची सद्यस्थिती आणि कमी उत्पादकता यावरती मात करण्यासाठी अतिसघन लागवड व दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर परिणामकारक ठरू शकतो व त्याचा प्रसार कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. दीपक दाहात ,प्रमुख शास्त्रज्ञ तेलबिया संशोधन केंद्र असे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना कापूस पीक तसेच इतर पिकामध्ये प्रभावी ठरवू शकतो.

शेतीसाठी यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास कमी श्रमात कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे सहज शक्य होत.

तांत्रिक सत्रमध्ये डॉ. जी. बी. चौधरी कापूस पैदासकार यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पद्धती बद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर आणि मूलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोंडांची संख्या व आकार वाढवून उत्पादनात वाढ होते आणि मातीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांनी कोणते लागवड अंतर निवडावे याबाबत मार्गदर्शन केले.अतिसघन लागवडीमध्ये न्यूमॅटिक प्लांटर चा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याबद्दल माहिती देताना शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी म्हणाले की, या तंत्राचा वापर करून बी योग्य खोल अंतरावर अचूकपणे सोडण्यास मदत होते तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणी सोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणे देखील शक्य होते. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास कमी श्रमात कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे सहज शक्य होत असल्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रकल्पातील यंग प्रोफेशनल श्रीमती मयुरी देशमुख यांनी केले तर आभार आशिष पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या