कोल्हापूर / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह :- यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार लोकसंघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना देण्याची घोषणा द. ना. गव्हाणकर पुरस्कार समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनावर प्रथम अधिकार हा स्थानिक समूहांचा असला पाहिजे अशी भूमिका घेऊन तापी, नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातील आदिवासी समूहांना संघटीत करून त्यांनी लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विकासाचा मुख्य प्रवाह हा येथील वंचित समूहांच्या सहभागाशिवाय आणि पर्यावरण पूरक धोरणान्शिवाय पूर्ण होऊ शकत नाही हा मुद्दा सातत्याने लावून धरला. शासन आणि प्रशासनाला त्यावर भूमिका घ्यायला भाग पाडले.
शालेय जीवनापासून कार्यकर्ती म्हणून छात्रभारती व सेवादल या पुरोगामी चळवळीत त्या वाढल्या आहेत. बीएस्सी फिजिक्समधून शिक्षण घेत त्यांनी एमएसडब्लू पदवी संपादन केली. पदवी घेतल्यानंतर प्रस्थापित वाट न चोखाळता त्यांनी सातपुडा पर्वतातील आदिवासींच्या लढ्याचे त्यांनी संघटना बांधून आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा उभारला. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, त्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी 50 हजार शेतकार्यांचा मोर्चा दिल्लीला नेला. २५ हजार आदिवासी स्त्री पुरुषांना संघटीत करून नंदूरबार ते मुंबई असा ४८० किमी पायी धडक मोर्चा त्यांनी मंत्रालयावर काढला.
दिल्लीला एक वर्ष चाललेल्या शेतकरी आंदोलनात त्या १२०० महिला घेऊन त्या सहभगी झाल्या. गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ शोषित जनतेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून जनसंघर्षात त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. एक प्रकारे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचा वैचारिक वारसा आपल्या कृतीशील जगण्यातून त्या पुढे घेऊन जात आहेत. म्हणूनच त्यांना लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थिती..
पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष जयवंत शिंपी, उपाध्यक्ष मोहनराव देसाई, मुकुंद देसाई, अल्बर्ट डिसोझा, कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, सचिव सुनील पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, मनोहर गव्हाणकर, दिगंबर लोहार, संजय घाटगे, प्रा. भीमराव पुंडपळ, रणजीत कालेकर, कृष्णा सावंत यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्रतिभा शिंदे यांचे पोलीस दक्षता लाईव्हतर्फे खूप खूप अभिनंदन ..