जळगाव / प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह :- गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शहरातील अनुष्का सेवाभावी संस्थेच्यावतीने गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण, रक्तदानाचा कार्यक्रम झाला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. दि. २१ जुलै रोजी सकाळी ११ गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. देवाचार्य अण्णा महाराज पाटील ,सेवा निवृत्त अभियंता नानाभाऊ बोरसे ,डॉ.गोळवलकर रक्तपेढीचे डॉ.राहुल चौधरी, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. दिलीप ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, कवी बी. एस व्हडगर, संस्थेचे सचिव वैशाली व्हडगर चित्रकार योगेश सुतार, प्रवीण पाटील, कलावंत तुषार वाघुळदे, प्रकाश पाटील व वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी वड, पिंपळ, चिंच, बेल आदी वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्यावतीने सायंकाळी चार वाजता पळसोद येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चित्रकार योगेश सुतार, कलावंत तुषार वाघुळदे, कवी बी.एस. व्हडगर ,हिंमत बाविस्कर ,सौरभ घोडेस्वार तसेच पर्यावरण प्रेमी महिला इतर मान्यवर वृक्षारोपणाच्या वेळी उपस्थित होते.
” निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे ” असे आवाहन गोदावरी मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.दिलीप ढेकळे यांनी केले..तर ग्लोबल वार्मिंग च्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांनी सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी व्यक्त केले.”वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली असून, जगा, जगवा अन् जगू दया..हा जीवन मंत्र आत्मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध कलावंत तुषार वाघुळदे यांनी केले. सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी, यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे अशी खंत कवी विरुदेव व्हडगर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याने बी.एस.व्हडगर व सौ.वैशाली व्हडगर यांचा नानभाऊ बोरसे यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच श्री क्षेत्र रामेश्वरम मंदिर परिसरातही वृक्षारोपण कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक घाडगे ,प्रवीण पाटील ,हिम्मत बाविस्कर,प्रकाश पाटील,सोमनाथ खरोटे ,शाहिद खाटीक आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन तुषार वाघुळदे तर आभार बी.एस.व्हडगर यांनी मानले.