जळगाव/ मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- शासन नियम व आदेशाविरुद्ध नियमबाह्य प्रती नियुक्तीवर बदली करण्याबाबत जळगाव प्रांतअधिकारी श्री विनय गोसावी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी. गुप्ता यांनी विभागीय महसूल आयुक्त, नाशिक विभाग यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे.
सेवावर्ग बेकायदेशीर असल्याचा गुप्ता यांचा आरोप
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, महसूल व वन विभाग मंत्रालयाने सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या निर्देशांनुसार वर्ग-३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५’ नुसारच कराव्यात असे स्पष्ट केले आहे. तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांनीही याबाबत आदेश दिले आहेत. असे असतानाही, जळगाव प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी तीन ग्रामविकास अधिकाऱ्यांची सेवावर्ग केली आहे. ही सेवावर्ग बेकायदेशीर असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.
तक्रारीत पाच लाखाच्या लाचेचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी
तक्रारीत असाही दावा करण्यात आला आहे की, गोसावी यांनी एका ग्रामविकास अधिकाऱ्याची सेवावर्ग करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतली आहे. गुप्ता यांनी विभागीय महसूल आयुक्तांकडे गोसावी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बढती रोखण्याची विनंतीही केली आहे.
जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ
गुप्ता यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विभागीय महसूल आयुक्त या प्रकरणी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.