पोलिस दक्षता लाइव्ह प्रतिनिधी जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) पथकाने “ऑपरेशन नार्कोस” अंतर्गत मोठी कारवाई करत सुमारे ८ किलो २०० ग्रॅम वजनाचा आणि सुमारे १.२३ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी त्यांना भुसावळ RPF कडे सोपवण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त आणि सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपनिरीक्षक प्रफुल्ल खर्चे, हेड कॉन्स्टेबल सुशील मराठे, गोपाल जाधव, तसेच कॉन्स्टेबल मनोज मौर्य आणि पंकज वाघ यांनीही कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
ही घटना ४ जून रोजी दुपारी १:३० वाजता घडली. जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने, त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील बॅगेतून गांजासारखा उग्र वास आल्याने बॅगची तपासणी करण्यात आली. तपासात त्या व्यक्तीने आपले नाव झबी उल्ला समी उल्ला (वय २७, रा. बेंगळुरू, कर्नाटक) असल्याचे सांगितले आणि गांजा असल्याची कबुली दिली. तो बेंगळुरूकडे कर्नाटक एक्सप्रेसने प्रवास करण्याच्या तयारीत होता.
या प्रकरणात दुसरा आरोपी भीमसिंह मालसिंग बारेला (वय ४२, रा. चोपडा तालुका, जि. जळगाव) यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि भुसावळचे सहायक सुरक्षा आयुक्त घटनास्थळी दाखल झाले. जप्त केलेल्या गांजाचे वजन इलेक्ट्रिक काट्याच्या सहाय्याने स्टेशन अधिकारी विलास फालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दोन्ही आरोपींविरोधात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील कारवाई सुरू आहे.