नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या सुशासन अभियानांतर्गत आणि महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ दिनांक १२ जून २०२५, गुरुवारी, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह इतर शासन विभागांच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. नागरिकांच्या महसूलविषयक समस्या सोडवणे, तसेच शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासन योजना पोहोचवणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात माननीय पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे शिबीर उपविभागीय अधिकारी विनय गोसावी व तहसीलदार सौ. शितल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.
शिबिरात नागरिकांना खालील सेवा व योजनांचा लाभ मिळणार आहे:
सलोखा योजनेचे अर्ज सादर करणे.
फेरफार मंजुरी व वारस नोंदी.
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लँड सिडिंग.
रेशन कार्ड दुरुस्ती व डिजिटल रेशन कार्ड वाटप.
उत्पन्न, जात, नॉन/क्रिमिलियर दाखले.
७/१२, ८अ उतारे, फेरफार नोंदी.
मयत खातेदाराचे नाव कमी करणे.
कर्ज बोजा कमी/चढविणे.
अ.पा.क. शेरा कमी करणे.
क्षेत्राचे लागवडीयोग्यमध्ये रूपांतर.
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज,
आरोग्य तपासणी, लसीकरण, मतदान कार्ड वाटप इत्यादी तसेच कृषी, आरोग्य, पंचायत समिती, महावितरण आदी विविध विभागांद्वारे देखील योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
नशिराबाद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, ग्राम महसूल अधिकारी रूपेश ठाकूर व नगर परिषद मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी नशिराबाद आणि परिसरातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.