आरोपींकडून ५० हजारांचा मुदत माल जप्त; मेहुणबारे पोलिसांची कामगिरी.
मेहुणबारे/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- चिंचगव्हाण गावात ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट चोरीच्या प्रकरणाचा मेहुणबारे पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ५०,००० रुपयांचा मुदत माल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ८ जून रोजी प्रितम पुरुषोत्तम बागुल (वय २६) यांनी मेहुणबारे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यांनी त्यांच्या शेतात शेडमध्ये उभा ठेवलेला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH-19-EA-3234) यावरून अज्ञात चोरट्यांनी ट्रॉली जोडण्याचे डाबर व पिना, तसेच रोटर नांगरासाठी लागणारे हात असे एकूण ५०,००० रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेले होते. यावरून पोलिसांनी गु. र. नं. १३७/२५ नोंदवून तपास सुरू केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संशयित आरोपी प्रवीण जालिंदर पाटील (वय २८) व दिलीप श्रीराम निकम (वय २२, दोघेही रा. चिंचगव्हाण) यांना ताब्यात घेतले.पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली असून, त्यांनी चोरीस गेलेले स्पेअर पार्ट पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी संपूर्ण मुदत माल जप्त केला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पो. उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ. मोहन सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार व पो. कॉ. विनोद बेलदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.