अमरावती/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील शेतकऱ्यांसाठी नव्या कर्जमाफी योजनेची तयारी सुरु असून, यावेळी ही योजना अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोझरी येथे दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफी केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता, गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन ‘वर्गवारी’ करण्यात येणार असून, आयकर भरणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना यामधून वगळले जाणार आहे. योग्य लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी आंदोलनकर्ते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी सुरु असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा हा सहावा दिवस होता. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांनी परिस्थितीची माहिती दिली.
सरकारकडून काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्यांबाबत लवकरच संबंधित खात्यांमार्फत निर्णय घेतला जाणार आहे. आंदोलन मागे घेण्याबाबतचा निर्णय शनिवार, १४ जून रोजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याची माहिती कडूंनी दिली. बावनकुळे यांनी यासंदर्भात लेखी आश्वासन दिलं आहे.