जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा आनंद साजरा करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात विविध शाळांमध्ये सोमवारी शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी बु. येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट-पायमोजे, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक दफ्तर वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भराडी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नांद्रा बु. आणि पिलखेडे (ता. जळगाव) येथील शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
या उत्सवात जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला:
श्री. युवराज पाटील (जिल्हा माहिती अधिकारी)
श्री. जनार्दन पवार (सहायक आयुक्त, नगरपरिषद)
श्री. भुषण वर्मा, श्री. राहुल पाटील, श्री. विवेक धांडे (मुख्याधिकारी – सावदा, चोपडा, जामनेर)
तहसीलदार श्रीमती नीता लबडे (भुसावळ)
नायब तहसीलदार श्री. रविंद्र उगले (एरंडोल)
मुख्याधिकारी श्री. रविंद्र लांडे (भडगाव)
कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शाळा प्रवेश उत्सव हा केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून, प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्याची पहिली पायरी मानली जाते. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वाच्या पुढाकारामुळे हा उत्सव अधिक प्रेरणादायी ठरला.