खर्ची, ता. एरंडोल, जि. जळगाव येथील घटना
जळगाव | प्रतिनिधी| पोलीस दक्षता लाईव्ह :- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी (दि. १७ जून) सकाळी खर्ची गावाजवळील शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास एरंडोल पोलीस करत असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मयत मुलाचे नाव तेजस गजानन महाजन (वय १३, रा. रिंगणगाव) असे आहे. तो आपल्या आई-वडील व बहिणीसह रिंगणगाव येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती व हार्डवेअरचे दुकान चालवतात.
सोमवारी (१६ जून) गजानन महाजन जळगाव येथे कामानिमित्त गेले होते. त्यांनी तेजसला दुकानावर बसवले होते. संध्याकाळनंतर तो घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्याच दिवशी गावात बाजार भरल्यामुळे गर्दी होती. कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्रभर शोध घेतला. मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात गळा चिरलेला मृतदेह दिसल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तो मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून बालकाच्या निर्घृण हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोबाईल फॉरेन्सिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी काही व्यक्तींना संशयावरून ताब्यात घेतल्याचे समजते. पुढील तपास सुरू असून पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत.