नागरिकांची लोकप्रतिनिधी बाबत नाराजी:
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद मधील महात्मा फुले नगर, ताज नगर आणि प्लॉट एरिया परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित भागांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी अनेकदा मागण्या करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या भागातील रस्ते उखडून तसेच ठेवण्यात आले आहेत. जेसीबीने काम सुरू करून रस्ते अपूर्ण अवस्थेत ठेवले जात असल्याने प्रवास करताना मोठी गैरसोय होत आहे. दररोज अवजड वाहने व अवैध रेतीची वाहतूक यामुळे रस्त्यांची खूपच दुर्दशा होत आहे. परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करून दिवाबत्तीची व्यवस्था करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील, सुनील महाजन, देवदास बाविस्कर, विजय पाटील, अतुल माळी, गोपाळ माळी, तुषार चौधरी आदींची उपस्थिती होती.
मुख्याधिकारींचं आश्वासन:
मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरच उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले.
नागरिकांची लोकप्रतिनिधी बाबत नाराजी:
स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या वेळी विकासाचे आश्वासन दिले होते, मात्र सध्या कोणीही पाठपुरावा करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नगरपरिषदेची निवडणूक झाली नसल्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. तरी लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या नशिराबाद नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सोडवाव्यात अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.