नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरात ट्रॅक्टर व मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मागील काही दिवसांत सलग बॅटऱ्या चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी व वाहनधारक हैराण झाले असून वाहनचालकांमध्ये तीव्र संताप आहे.चोरट्यांनी गावातील विविध भागांतील ट्रॅक्टर, रिक्षांचे बॅटऱ्या, डाबर व इतर महत्त्वाचे भाग चोरून नेल्याने ग्रामीण जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.या विषयी पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
सविस्तर वृत्त असे की, द्वारका नगर येथील मयूर शांताराम पाटील यांच्या नवीन ट्रॅक्टरची बॅटरी 15 दिवसांपूर्वी चोरीस गेली होती. त्यानंतर पुन्हा 15 जून 2025 रोजी त्याच परिसरातून ट्रॅक्टरची बॅटरी व पान्हे चोरट्यांनी चोरून नेले. याच दिवशी महेश कोल्हे (रा. श्रीकृष्ण नगर) यांच्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या, डाबर आणि इतर महत्त्वाचे सामान चोरीस गेले. ह्यामुळे त्यांच्या शेतकामात अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच, म्हसोबा पाण्याच्या टाकीजवळील ज्ञानदेव मंगा पाटील यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी देखील चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. फक्त ट्रॅक्टरच नाही तर रिक्षाचालक देखील या चोरट्यांच्या रडारवर आहेत. द्वारका नगर येथील बबलू शेख यांच्या मालवाहतूक ऑटो रिक्षाची बॅटरी चोरीस गेली आहे. या सततच्या चोरीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून रात्रगस्ती वाढवण्याची व चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.
या घटना सलग घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची, तसेच चोरट्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. परिसरात गस्त वाढवावी, वाहनांवर सतत लक्ष ठेवावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलीसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.