जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “आणीबाणी @५०” या विशेष माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन आज जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगाव येथे करण्यात आले. हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे भरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे आणि जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये प्राचीन भारतीय लोकशाहीपासून १९७५ च्या आणीबाणीपर्यंतचा प्रवास विविध माहिती फलकांद्वारे सादर करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना, बुद्धकालीन राजकीय व्यवस्था, भारताचा स्वातंत्र्यलढा, संविधानाची रचना आणि आणीबाणीच्या काळातील घटनांचा समावेश आहे.
दस्तऐवज, छायाचित्रे, वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या माध्यमातून त्या काळातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच, माध्यमांवरील निर्बंध, अटकसत्रे आणि संविधानिक अधिकारांवरील मर्यादा यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील यांनी या प्रदर्शनाची संकल्पना आणि मांडणी याचे सविस्तर विवेचन कार्यक्रमात सादर केले. हे प्रदर्शन पुढील काही दिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असून, विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत सर्वांनी याचा अभ्यासासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि माहिती विभागाने केले आहे.