जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगावमधील एका शेअर दलालाची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने सांगली जिल्ह्यातील लिंगनूर (ता. मिरज) येथे बोलावून ही फसवणूक करण्यात आली. फिर्यादी यश दिलीप रडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव, सध्या रा. पुणे) यांच्याशी सराईत गुन्हेगार लक्ष्मण नाईक याने संपर्क साधून सोने स्वस्तात मिळेल, असे सांगितले.
यानुसार रडे हे मार्च महिन्यात २५ लाख रुपये घेऊन लिंगनूर येथे गेले. शेतात सोने दाखवले जात असताना पोलिस वेशातील दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळी आल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी सोनं आणि रक्कम नेल्याचा बनाव करून रडे यांना गावी परत पाठवण्यात आले. त्यानंतर रक्कम परत मिळवण्यासाठी रडे यांनी पाठपुरावा केला. मात्र आरोपी टाळाटाळ करू लागल्याने त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
या प्रकरणी लक्ष्मण नाईक (रा. लिंगनूर) याच्यासह प्रेम, राजेश, शिवा, एक कानडी भाषा बोलणारा व्यक्ती आणि पोलिस वेशातील दोन अनोळखी अशा एकूण सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मण नाईक याच्यावर यापूर्वीही बनावट नोटा, चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.