पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांवर लहान वयात तिसरी भाषा म्हणून हिंदी लादणे योग्य नाही. त्याऐवजी हिंदीचे शिक्षण पाचवी इयत्तेपासून सुरू करावे, असे त्यांचे मत आहे.
अजित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण काळात मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी ही राज्याची मातृभाषा असून, तिचा पाया घट्ट व्हावा यासाठी ती पहिल्या इयत्तेपासून शिकवली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.राज्य सरकारने अलीकडेच एक आदेश काढला आहे, ज्यात पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याचे नमूद आहे. मात्र, हा विषय वादाचा ठरला असून विविध स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत.पवार म्हणाले, “मी कोणत्याही भाषेचा विरोध करत नाही. परंतु, लहान मुलांवर एकाच वेळी जास्त भाषांचा अभ्यास लादणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना सुरुवातीला त्यांच्या मातृभाषेत सक्षम करण्यावर लक्ष द्यायला हवे.”
याच मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही आपला विरोध नोंदवला आहे. त्यांनी सांगितले की, “मराठी ही समृद्ध भाषा आहे आणि ती मुलांनी लहान वयात आत्मसात केली पाहिजे. हिंदीचे शिक्षण जर द्यायचेच असेल, तर ते पाचवीनंतर सुरू करावे.”राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की हिंदी भाषा अनिवार्य नसेल. इतर कोणतीही भाषा शिकवायची असल्यास किमान २० विद्यार्थ्यांची संमती आवश्यक आहे.