आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न ; तिघांना अटक
एरंडोल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेला अपघात हा प्रत्यक्षात पूर्वनियोजित घातपात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्यातील फिर्यादी कल्पना दशरथ महाजन (वय ४१, व्यवसाय माजी नगरसेविका, न.प. एरंडोल) यांनी दिनांक १४ जून २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांचे पती दशरथ बुधा महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असून, त्यांचे राजकीय व वैयक्तिक मतभेद काही लोकांशी होते. त्यांच्या अपघातासंबंधी संशय निर्माण झाल्याने त्यांनी सदर प्रकार घातपात असण्याची शक्यता वर्तवली होती.या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली.
सदर प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज गोळा करताना वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने अडथळे निर्माण झाले. मात्र तपास पथकातील पोहवा प्रविण मांडोळे व राहुल कोळी यांनी एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे सातत्याने ८ तास परीक्षण करून आरोपींचा शोध लावला.तपासादरम्यान आरोपी 1. उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), 2. शुभम कैलास महाजन (वय १९), 3. पवन कैलास महाजन (वय २०) (सर्व रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) निष्पन्न करण्यात आले आहे.
सदर आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्हा पूर्ववैमनस्यातून केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी आरोपी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.सदर तिन्ही आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात आले असून, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. कविता नेरकर (अप. पो. अधीक्षक, चाळीसगाव), मा. विनायक कोते (उपविभागीय पो.अ., अमळनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संदीप पाटील, पोनि निलेश गायकवाड, पउनि शरद बागल, तसेच पोलिस शिपाई आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.