Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeनाशिककुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रस्ते विकासाला गती; ३७०० कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रस्ते विकासाला गती; ३७०० कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुधारणा आणि रस्त्यांच्या विकासाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ३७०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. महाजन यांच्या म्हणण्यानुसार, घोटी–त्र्यंबकेश्वर–जवाहर रस्त्याचा चौपदरीकरण करून तो थेट मुंबईशी जोडला जाणार आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या काळात होणाऱ्या गर्दीचा भार कमी होईल आणि ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत राहील.

रिंग रोडच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश.

याशिवाय, नाशिक–सिन्नर मार्गाचाही विस्तार करण्यात येणार असून, नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचेही नवे स्वरूप तयार होईल. नाशिक शहरासाठी महत्वाच्या असलेल्या रिंग रोडच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सर्व कामे येत्या दीड ते दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव ते संभाजीनगर मार्गाने मुंबईशी जोडणीसाठी पर्याय.

तसेच जळगाव ते संभाजीनगर मार्गाने मुंबईशी जोडणीसाठी पर्याय शोधण्यात येत आहे, जेणेकरून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील प्रवाशांना अधिक चांगला पर्याय मिळू शकेल.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अजूनही घोषणा नाही.

दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या जिल्ह्यात चार मंत्री कार्यरत असूनही पालकमंत्रीपद रिक्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील नाशिक दौऱ्यात या पदाच्या बाबतीत चर्चा झाली होती, मात्र कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या