जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव रेल्वे स्थानक आणि परिसरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुरुवारी महत्त्वाची कारवाई करत दोन संशयित चोरट्यांना अटक केली. या वेळी त्यांच्या ताब्यातून एकूण पाच महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. रेल्वे प्रवाशाचा १.३० लाख रुपये किमतीचा मोबाईल १७ जून रोजी बदनेरा ते नाशिक जाणाऱ्या मेमो ट्रेनमध्ये जळगाव स्थानकात चढताना चोरीला गेला होता. या प्रकरणाची तक्रार जीआरपी भुसावळ येथे दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरपीएफ इन्स्पेक्टर अमित कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने संशयितांचा शोध घेण्यात आला. २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख इमरान शेख गुफरान (वय २२, रा. मालेगाव) आणि शेख अश्फाक शेख मुस्ताक (वय ३०) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान त्यांनी रेल्वे स्टेशनसह जळगाव शहर बसस्थानकातूनही मोबाईल चोरीची कबुली दिली.
पुढील कारवाईसाठी शेख इमरान याला जळगाव शहर पोलिसांकडे, तर शेख अश्फाक याला जीआरपी भुसावळकडे सुपूर्द करण्यात आले आहे.