मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील एकल महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना ठरवण्यासाठी विधानभवन येथे विशेष बैठक पार पडली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील एकल महिलांसाठी सुरक्षा, रोजगार, आरोग्य व आर्थिक स्वावलंबन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यासोबतच अशा महिलांचा डेटा संकलित करून, त्यांना प्राधान्य देणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागांना दिले.महसूल, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, आरोग्य, रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून हे काम पार पाडण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत एकल महिलांसाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये विशेष आरक्षण, कौशल्यविकास प्रशिक्षण, स्वरोजगारासाठी अर्थसहाय्य, तसेच महिला बचतगटांमार्फत मदतीचे मार्ग खुले करण्याच्या बाबींचा समावेश करण्यात आला.राज्य शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून एकल महिलांच्या सर्वांगीण सशक्तीकरणासाठी कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.