पारोळा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- पारोळा तालुक्यातील सुमठाणे गावाजवळील वनक्षेत्रात आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा उलगडा पारोळा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या संयुक्त तपासातून करण्यात आला. अवघ्या दोन दिवसांत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.२६ जून रोजी सुमठाणे गावाजवळील राखीव कुरण जंगलात ४५ ते ५० वयोगटातील महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता पवार, व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. महिला कोण आहे याचा तपास करत असताना, उंदीरखेडे येथील शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८) या हरविल्याची माहिती मिळाली. फोटो व वर्णनाच्या आधारे मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
तपासा दरम्यान शोभाबाई कोळी यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले. त्यातून सुमठाणे गावातील अनिल गोविंदा संदांशिव (वय ४५) हा संशयाच्या भोवऱ्यात आला. आरोपी फरार झाला होता, मात्र २८ जून रोजी धुळे जिल्ह्यातील शिताणे गावाजवळ मोटारसायकलवर जात असताना त्याला अटक करण्यात आली.अटक केल्यानंतर चौकशीत आरोपीने शोभाबाई कोळी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसाठी खून केल्याची कबुली दिली. तो पीडितेसोबत पूर्वीपासून ओळखीत होता. विश्वासात घेऊन तिला वनक्षेत्रात नेऊन तिचा खून करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सचिन सानप (पारोळा पो.स्टे), व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली.