भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ-जळगाव सीमेवरील नदीकाठच्या जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून २ किलोमीटर जंगलात पायी जाऊन छापा टाकला.सदर ठिकाणी जेसीबी व डंपरच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिस व नगरपरिषद कर्मचार्यांसह घटनास्थळी धडक दिली.
कारवाईदरम्यान काही वाहनचालकांनी जेसीबी व डंपर सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. काहींनी मुरूम रस्त्यावर फेकून वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र, प्रशासनाने त्वरेने पुढाकार घेत १ जेसीबी मशीन, व ७ डंपर वाहने जप्त करून पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. वनविभाग व महसूल प्रशासन यांची संयुक्त तपासणी सुरू आहे.
तहसीलदार नीता लबडे यांच्या धाडसी आणि वेळेवरच्या कृतीमुळे अवैध खनिज उत्खननावर तातडीने रोक बसली असून, त्यांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.