मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि शेतमाल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेतकऱ्यांकडून थेट शेतात जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना घेणे बंधनकारक असेल.ही माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पावसाळी अधिवेशनातील विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
“राज्यात अनेक व्यापारी शेतकऱ्यांकडून बांधावर थेट शेतमाल खरेदी करताना अयोग्य दर देतात किंवा चुकीचे मोजमाप करून फसवणूक करतात. हे प्रकार रोखण्यासाठी आता बांधावर खरेदी करणाऱ्यांकडे वैध परवाना असणे अनिवार्य असेल,” असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील व्यवहार अधिक कायदेशीर, पारदर्शक आणि सुरक्षित होतील. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून व्यवहारांची नोंद होईल, त्यामुळे गरज पडल्यास शेतकऱ्यांना आपली तक्रार अधिकृतपणे नोंदवता येईल.
महत्वाचे मुद्दे:
व्यापाऱ्यांना स्थानिक बाजार समितीचा परवाना आवश्यक,
परवाना नसल्यास बांधावर खरेदीस मनाई,
शेतकऱ्यांना योग्य दर, पारदर्शक व्यवहार आणि कायदेशीर संरक्षण.
या निर्णयाचे शेतकऱ्यांमध्ये स्वागत होत असून, कृषी क्षेत्रात शिस्तबद्धता आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.