1,846 मातांचे दुग्धदान; 2,000 हून अधिक नवजातांना जीवनदायी पोषण
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘ह्युमन मिल्क बँक’ मागील वर्षभरात अनेक नवजात बाळांसाठी जीवनरेषा ठरली आहे. मार्च 2024 मध्ये सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमामुळे दुग्धवंचित बाळांना मातेच्या दुधाचा आधार मिळत आहे.
या बँकेच्या माध्यमातून 1,846 सहृदयी मातांनी दुग्धदान केले असून, 2,000 हून अधिक नवजात बाळांना पोषण मिळाले आहे. विशेषतः अशक्त, आजारी व अनाथ बाळांसाठी ही सेवा संजीवनी ठरली आहे.प्रमुख जयश्री पाटील व डॉ. शैलजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पाच सदस्यीय टीम दुग्धदानासाठी समुपदेशन करते. काही माता सुरुवातीला संकोच करत असल्या तरी योग्य मार्गदर्शनामुळे आता अनेक माता पुढाकार घेत आहेत.
“मातेचे दूध म्हणजे फक्त अन्न नव्हे, ती जीवनरेषा आहे,” असा संदेश देत जळगाव जिल्ह्यातील माता भगिनींना दुग्धदानाचे आवाहन करण्यात येत आहे.हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व आयुष प्रसाद यांच्या प्रेरणेतून सुरू झाल्याने जिल्ह्यात बालकल्याणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.