जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वरणगाव पोलिस स्टेशनच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने अटक केली. सदर आरोपी केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, धरणगाव) याच्यावर यापूर्वीही शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो मागील सहा महिन्यांपासून फरार होता.
मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे आणि फरार आरोपी यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार आज, २ जुलै २०२५ रोजी श्रीकृष्ण देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरणगाव हद्दीतील फुलगाव फाट्याजवळ सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. त्यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान केशव भालेराव याच्या विरोधात याआधीही वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले असून तो दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ पासून फरार होता.सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रे. पो.उ.नि. रवी नरवाडे, पोह गोपाळ गव्हाळे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पो.अं. रविंद्र चौधरी यांनी केली.