प्रशासकीय इमारतीत ट्रॅक्टर जमा; वाळू माफियांना दणका
जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- असोदा रोड परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. ही कारवाई तातडीने करत ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून, तो प्रशासकीय इमारतीमध्ये जमा करण्यात आला आहे.
ही मोहीम नियोजित स्वरूपात पार पाडण्यात आली. यामध्ये नशिराबाद व भोकर येथील मंडळ अधिकारी तसेच कडगाव, बेळी, जळगाव शहर, तरसोद, भोकर व करंज येथील ग्राम महसूल अधिकारी सहभागी होते.
जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितले की, अवैध वाळू वाहतूक ही पर्यावरणासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे महसूल व पोलिस विभाग एकत्रितपणे रात्रगस्त करत असून कुठेही अवैध उत्खनन किंवा वाहतूक होत असल्यास तत्काळ कारवाई केली जात आहे.
जनतेस आवाहन
अवैध वाळू उत्खनन अथवा वाहतूक दिसून आल्यास नागरिकांनी प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. “आपला सहभाग म्हणजे पर्यावरणाचे रक्षण” असे प्रशासनाने स्पष्ट केले.