जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे एका नागरिकाची ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १० लाख रुपये होल्ड करून वाचवले असून, उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.याबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची पद्धत:
फिर्यादी यांना अनोळखी कॉलवरून सांगण्यात आले की, त्यांच्या खात्यावर ६.८ कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात १०% रक्कम जमा झाली आहे. तसेच दिल्ली येथे गुन्हा दाखल असून अटक होऊ शकते, असे सांगत व्हिडीओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट” करण्यात आले.त्यांना बंद खोलीत बसवून, कोणाशीही संपर्क साधू न देता, ३ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३१,५०,०००/- रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले गेले. सदर रक्कम फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावावरील एफडी मोडून ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आली.
पोलिसांची तत्काळ कारवाई:
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पीएसआय मुस्तफा मिर्झा, व पोलीस नाईक दिलीप चिंचोले यांनी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार करून एका खात्यातील १० लाख रुपये होल्ड केले असून, सदर रक्कम मा. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस परत दिली जाणार आहे.
पोलिसांचे जनतेस आवाहन:
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. CBI, ED, कस्टम ऑफिस अशा नावाने येणाऱ्या कॉल्सवर विश्वास ठेवू नये. “डिजिटल अरेस्ट”, “किडनॅपिंग”, “ह्युमन ट्राफिकिंग” अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.तसेच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक यावरून येणाऱ्या शेअर मार्केट किंवा टास्क वर्कच्या जाहिरातींवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नये.
🛡️ सायबर फसवणूक झाल्यास:
📍 वेबसाईट: http://www.cybercrime.gov.in
📞 हेल्पलाइन नंबर: 1930
🚓 जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा