नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेची पूजा व आरतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत पारंपरिक पाऊल खेळले.इयत्ता चौथीच्या ‘जुई’ वर्गातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतावर नृत्य सादर केले, तर ‘अबोली’ वर्गातील विद्यार्थ्यांनी “रडू नको बाळा रे मी पाण्याला जाते” ही गवळण सादर केली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती. टाळ, मृदंग, ढोल ताशांच्या गजरात शाळेचा परिसर भक्तिमय झाला होता.
या कार्यक्रमात विठ्ठलाच्या भूमिकेत आरुष अक्षय महाजन व प्रणव विशाल माळी, रुक्मिणीच्या भूमिकेत सिद्धी महेंद्र माळी व विधी जितेंद्र नेहते, ज्ञानेश्वर महाराज म्हणून सम्यक शशिकांत रंधे व तुकाराम महाराज म्हणून भावेश प्रशांत पाटील यांनी सादरीकरण केले.कार्यक्रमानंतर माध्यमिक विभागात स्काऊट-गाईड युनिटद्वारे ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. बाल विठ्ठल-रुख्मिणी व मान्यवरांच्या उपस्थितीत आंबा, वड व कडुलिंब यासारख्या वृक्षांची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विनायक वाणी, सचिव मधूकर चौबे, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, ऍड. प्रदीप देशपांडे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुनिता बनसोडे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सुनिता शिवरामे, स्वाती चौधरी, दिव्या सावळे व ममता महाजन यांनी केले. मुख्याध्यापक प्रविण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.