चाळीसगाव |प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. २९ जून रोजी सायंकाळी सुमारास कन्नड घाटात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत संशयास्पदरित्या आढळून आले होते. प्रकरण अत्यंत गंभीर व गुंतागुंतीचे असल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतदेहाजवळ कोणतेही ओळख पटवणारे पुरावे नसल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलीसांनी तत्काळ मृताच्या अंगावरील वस्तू, शारीरिक खुणा व गोंदलेल्या निशाण्यांची तपास यादी तयार करून ती सोशल मिडियावर प्रसारित केली. त्यातून मृत व्यक्तीची ओळख जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. जि. धुळे) अशी पटली.
यापूर्वी त्यांच्या हरवल्याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती. यानंतर मृताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की, गावातील शुभम सावंत, अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाच्या बहाण्याने जगदीश यांना घराबाहेर नेले व राजकीय वैमनस्यातून त्यांचा खून करून प्रेत कन्नड घाटात फेकून दिले. त्यानुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मृताचे गोळी मारून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपास व कारवाई करणारे अधिकारी:
ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी (सो. जळगाव), अप. पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर (सो. चाळीसगाव परिमंडळ), व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास व अंमलबजावणीत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि प्रदीप शेवाळे, राहुल राजपूत, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोउपनि शेखर डोमाळे, पोकॉ महेश पाटील, भुषण शेलार, वाहन चालक: बाबासाहेब पाटील तसेच चाळीसगाव ग्रामीण व शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ असे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते
पुढील तपास:
या गंभीर हत्याकांडाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.