एरंडोल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात घरात घुसून गृहीणीवर अत्याचार करत जबरदस्तीने दागिने व रोकड लुटणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान, जयहिंद चौक, गांधीपुरा येथे राहणाऱ्या उषाबाई भिका बडगुजर (वय ५२) यांच्या घरात तिन-चार अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने प्रवेश केला. त्या झोपेत असताना तोंड कपड्याने बांधून, हात-पाय दोरीने गाठून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर अंगावरील ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.५ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी पलायन केले.या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली.
गोपनीय माहितीच्या आधारे मयूर अरुण बडगुजर (वय २०, रा. जगवानी नगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यासोबत नंदू भगवान निकुंभ (वय ३३, रा. जुने जळगाव) व तुषार सुनिल महाजन (वय २२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असल्याची माहिती दिली. संबंधित दोघांनाही विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व ३ मोबाईल जप्त करण्यात आले असून, लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पो.नि. निलेश गायकवाड, स.पो.नि. शंकर पवार, पोहेकॉ अनिल पाटील, पो.ना. दीपक पाटील, योगेश महाजन, सचिन पाटील, पो.कॉ. अमोल भोसले, आकाश शिंपी व भाऊसाहेब मिस्तरी यांनी विशेष मेहनत घेतली.