जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील विद्यानगर परिसरात सोमवारी (दि. ७ जुलै) दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. १२ वर्षीय हार्दिक प्रदीपकुमार अहिरे या मुलाचा छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हार्दिक हा रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेल्या प्रदीपकुमार अहिरे यांचा दत्तक मुलगा होता. २०१५ मध्ये त्यांनी पुण्यातील एका संस्थेतून त्याला दत्तक घेतले होते.सोमवारी दुपारी हार्दिक शाळेतून घरी आल्यानंतर आईने त्याला चहा-बिस्किटे दिली. त्यानंतर ती त्याच्या लहान भावाला ट्यूशनला घेऊन गेली होती. यावेळी हार्दिक शेजारील पदमसिंह राजपूत यांच्या घरी खेळायला गेला. खेळत असताना छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक गळ्याभोवती अडकून त्याचा श्वास घोटला गेला. त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते.काही वेळाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात ही बाब येताच तिने आरडाओरड केली. हार्दिकला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे अहिरे कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली असून निष्पाप मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.