जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील डोमगाव गावात एक दु:खद घटना घडली असून, ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आर्थिक अडचणींना कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव किशोर आसाराम धनगर असून, ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्जाचे ओझे होते. यंदा पावसाने दडी मारल्याने त्यांनी दुबार पेरणी केली, मात्र खर्च वाढल्याने ताण अधिकच वाढला होता.
सोमवारी सकाळी ते शेतावर गेल्यानंतर म्हसावद रेल्वे गेटजवळ त्यांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.किशोर धनगर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक ७ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक नागरिकांनी शासनाने या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.