मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कुऱ्हा येथील शाळेत शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर लघुशंकेसाठी गेलेल्या मुलीला तिघा अज्ञात तरुणांनी बेशुद्ध करून दुसऱ्या शाळेच्या जिन्याखाली डांबून ठेवले होते.विद्यार्थिनी शुद्धीवर आल्यानंतर तिने सांगितलेल्या माहितीनुसार, तिच्या तोंडाला सुगंधी रुमाल लावून बेशुद्ध केल्याचे आणि नंतर तोंड व हातपाय बांधून ठेवले असल्याचे समोर आले आहे.मुलगी शाळा सुटून घरी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता ती दुसऱ्या शाळेच्या बाजूला जिन्याखाली सापडली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी कुऱ्हा पोलिस चौकीत धाव घेतली. यावेळी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.पीडित मुलीने यापूर्वी काही तरुण तिच्या पाळतीवर असल्याची माहिती शाळेला व पालकांना दिली होती. तरीही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.