मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील सातबारा उताऱ्यावर आता केवळ जमिनीचे क्षेत्रच नव्हे, तर भावांमधील पोटहिस्सा देखील अधिकृतपणे नोंदविण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प हाती घेतला असून, प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके निवडण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या नव्या उपक्रमामुळे वारसांमध्ये झालेली जमिनीची वाटणी अधिक स्पष्ट होणार असून, शेतकऱ्यांना स्वतंत्र हक्क सिद्ध करणे सोपे होणार आहे. आतापर्यंत सातबाऱ्यावर फक्त एकूण जमीन क्षेत्राची नोंद होत होती. मात्र, आता भावांमधील वाटणी आणि पोटहिस्सा अधिकृत नोंदवता येणार आहे.
यासाठी जमिनीची वाटणी ₹५०० च्या स्टॅम्प पेपरवर करता येणार असून, पोटहिस्सा मोजणीसाठी ₹२०० शुल्क आकारले जाईल. विशेष बाब म्हणजे, किमान एक गुंठा क्षेत्र सुद्धा स्वतंत्रपणे सातबाऱ्यावर नोंदविता येणार आहे.
दरम्यान, पाणंद रस्त्यांच्या संदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सहज व वादमुक्त प्रवेश मिळावा यासाठी पाणंद रस्त्यांची किमान रुंदी आता १२ फूट बंधनकारक करण्यात येणार आहे.