Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeरावेरआई-वडिलांचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी ; विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचा स्तुत्य उपक्रम!

आई-वडिलांचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी ; विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचा स्तुत्य उपक्रम!

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नूतन प्राथमिक विद्यालय, चिनावल येथे एक आगळावेगळा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. आपल्या जीवनातील पहिले गुरु असलेल्या आई-वडिलांचे पूजन करून विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर शाळेतील शिक्षक-गुरुजनांचेही पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन खेमचंद्र गोवर्धन पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना “मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून वाचनाची सवय लावा. ज्ञानासाठी आई-वडिलांचे व गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या,” असा मौलिक सल्ला दिला.

कार्यक्रमास सचिव श्री गोपाळ देवचंद पाटील, सदस्य श्री मनोहर विठ्ठल पाटील, मुख्याध्यापक श्री गणेश सुभाष बाविस्कर, उपमुख्याध्यापक श्रीमती मीनल नेमाडे, तसेच शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती भावना प्रल्हाद चौधरी यांनी केले. यावेळी श्रीमती सपना टोके यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले, तर श्रीमती हर्षाली कोल्हे यांनी गुरु-शिष्य परंपरेवर प्रभावी भाष्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत श्रीमती विनिता नारखेडे, कविता नेमाडे, कविता पाटील आणि श्री मिलिंद गारसे यांचा मोलाचा सहभाग होता.पालक प्रतिनिधी श्रीमती नंदिनी प्रदीप भालेराव यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीराम-वशिष्ठ, श्रीकृष्ण-सांदीपनी, गौतम बुद्ध-सारी पुत्र, स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस, संत चांगदेव-मुक्ताबाई यांसारख्या प्रसिद्ध गुरु-शिष्य जोड्यांचे देखणे सादरीकरण केले. श्री कुलभूषण पाटील यांनी गुरु-भक्तीपर गीत सादर करून वातावरण अधिक भावपूर्ण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री योगेश बोरोले, चंद्रकांत कुरकुरे, श्री तडवी, श्रीमती सरोदे व श्रीमती जुम्मा तडवी यांचे विशेष सहकार्य लाभले.आई-वडिलांचे व गुरुजनांचे पूजन करताना अनेक पालक भावुक झाले. विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, शिस्त व संस्कारांचे बीज पेरणारा हा उपक्रम नूतन विद्यालयाच्या संस्कारक्षम शिक्षणदृष्टिकोनाचा प्रेरणादायी नमुना ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या