मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील अपूर्ण रस्ते, भूखंड विकास, व गाळा वाटपासारख्या नागरी प्रश्नांबाबत आमदार राजू मामा भोळे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना सादर करत शासनाचे लक्ष वेधले. भोळे यांनी स्पष्ट केले की, शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जरी खरे असले, तरी जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये तब्बल ५८ कोटी रुपयांचा निधी बाकी असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
“आम्हाला आणखी १०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास रस्ते कामांना गती येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात भूखंड असूनही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. हे भूखंड शासनाने विकसित करण्यासाठी आदेश द्यावेत, जेणेकरून त्यातून निधी उभा राहून नागरिकांना पायाभूत सुविधा देता येतील. गाळा वाटपाचा प्रश्नही त्यांनी अधोरेखित केला. “मागीलवेळी आठ टक्के आकारणी स्थगित होती, तरी अजूनही गाळे वाटपाचा निर्णय झाला नाही. कमी दरात आणि शासकीय दरानुसार गाळे वाटप व्हावे,” अशी मागणी त्यांनी केली.भोळे यांनी नवीन एमआयडीसी परिसरात मंदिर उभारण्यात आल्याची माहिती देखील सभागृहात दिली.
दरम्यान, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तालिका अध्यक्ष समीर त्रंबकराव कृष्णवार यांनी सांगितले की, २६४ काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. डांबरीकरणासाठीही ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गाळा वाटप संदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.